Article By Dr. Ankush jadhav : ‘आत्महत्येचे दुष्टचक्र’

Article By Dr. Ankush jadhav : ‘आत्महत्येचे दुष्टचक्र’

Pckhabar-विज्ञानात  प्रचंड प्रगती झाली असली तरी  मानवी मन हे एक न समजलेले, उलगडले  कोडेच राहिले आहे. सामान्यतः नैराश्यग्रस्त लोक आत्महत्या करतात. परंतु हे नैराश्य कोणाच्या मनात कशाने व का निर्माण होईल हे सांगणे आज ही कठीण आहे. कारण कारणे ही व्यक्तीनुसार वेगवेगळी असतात. आत्महत्या करणाऱ्यात श्रीमंत आहेत तसेच गरिब हीआहेत. उच्च पदस्थ आहेत तसेच बेरोजगार ही आहेत. तरुण आहेत तसेच वृद्ध ही आहेत. शेतकरी आहेत तसेच नोकरदार आहेत. थोडक्यात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये सर्वच थरातील लोकांचा समावेश आहे.

८ ऑक्टोबर ला केंद्रीय अन्वेषण विभागाचे(CBI) माजी संचालक अश्वनी कुमार यांनी  शिमला येथे वयाच्या ७० व्या वर्षी आत्महत्या केली. कोरोना काळात अनेक आत्महत्या झाल्या. त्यातच १० सप्टेंबर ला”जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस”साजरा केला गेला. जगात सर्वत्रच आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.
       जगभरात दरवर्षी ८ लाख लोक आत्महत्या करतात.  जगात साधारणतः दर ४० सेकंदाला एक आत्महत्या होते. तर जगात प्रत्येक ३ सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रत्येक ८ पुरुषामागे एका पुरुषाला व प्रत्येक ६ स्रियांमागे एका स्री ला डिप्रेशन म्हणजे अवसाद, नैराश्य असते.

भारतात मानसिक आजारांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे प्रमाण १९९० पासून २०१७ पर्यंत दुपटीने वाढले आहे. यात नैराश्य, भयगंड, व्यक्ती दुभंग, वर्तन विषयक समस्या इ. आजारांचा प्रामुख्याने समावेश आहे.

नुकतेच भारत सरकारच्या “राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागा”ने  जी आकडेवारी जाहीर केली, त्यानुसार २०१९ मध्ये  भारतात एकूण १लाख ३९ हजार १२३ लोकांनी आत्महत्या केली तर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या ४० पट अधिक आहे.

भारतात २०१५ मध्ये १,३३,६२३,२०१६ मध्ये १,३१,००८,२०१७ मध्ये १,२९,८८९,२०१८ मध्ये ८९,४०७ तर२०१९ मध्ये १,३९,१२३ लोकांनी आत्महत्या केल्या. १,३९,१२३ लोकांपैकी ९३,०६१ हे तरुण १८ ते ४५ या वयोगटातील होते. हे सर्व तरुण होते. यांचे प्रमाण ६७ टक्के आहे. २०१८ पेक्षा २०१९ मध्ये आत्महत्येत ४.४ टक्के वाढ झाली.

आत्महत्या होणारी प्रमुख राज्ये-
१) महाराष्ट्र-१३.६ टक्के २)तामिळनाडू-९.७ टक्के
३)प. बंगाल-९.१टक्के
४)म. प्र.-९टक्के
५)कर्नाटक-८.१टक्के.
  
वयानुसार आत्महत्त्येंचे प्रमाण-
१)१८पेक्षा कमी-६.९टक्के
२)१८ते ३०-३५.१टक्के
३)३० ते ४५-३१.८ टक्के.

शिक्षणानुसार प्रमाण-
१)अशिक्षित ते १२-८५.८टक्के २)पदविका व त्यावरील-४.९टक्के.

विवाहानुसार-
१)विवाहित-६६.७ टक्के २)अविवाहित-२३.६टक्के.
  आर्थिक स्थिती नुसार-
१)१ लाखा पेक्षा कमी उत्पन्न -६६.२टक्के २)१ते५ लाख उत्पन्न-२९.६टक्के.

आत्महत्येंची प्रमुख कारणे-
१)कौटुंबक व वैवाहिक-३७.९टक्के २)गंभीर आजार-१७.१ टक्के
३)विविध व्यसने-५.६ टक्के ४)प्रेमभंग-४.५ टक्के ५)कर्जबाजारीपणा-४.२ टक्के.
 
भारतात १० लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली एकूण ५३ शहरे आहेत. त्यातील मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई  या शहरांमध्येच ३६.६ टक्के आत्महत्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे भारतात लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठ्या असणाऱ्या उत्तर प्रदेशात आत्महत्येचे प्रमाण अन्य राज्यांच्या मानाने खूप कमी आहे. वरील सर्वांचा विचार केला तर लक्षात येईल की, सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात. ३०ते ४५ या वयोगटातील लोक जास्त आत्महत्या करतात. अशिक्षित ते १२ पर्यंत शिक्षण झालेले तरुण तसेच विवाहित लोक जास्त आत्महत्या करतात. कौटुंबिक, वैवाहिक भांडणातून तसेच आर्थिक स्थितीतून जास्त आत्महत्या होतात.

महाराष्ट्रात आत्महत्या जास्त असण्याचे कारण हे ही एक आहे की, येथे संपूर्ण भारतातून, जगातून लोक येतात.

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीत दिसून येणारी सामान्य लक्षणे

व्यक्ती सतत दुःखी राहणे, सतत नकारात्मक विचार करीत असणे, एकटे-एकांतात राहण्याचा प्रयत्न करीत असणे, नेहमीच्या व्यवहारात बदल करणे, मानसिक स्थिती ठीक नसणे, प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू होणे, सततच्या अपयशामुळे दिनक्रमात बदल होणे, सतत भीतीच्या छायेखाली वावरणे, निराश असणे इ.काही लक्षणे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीत काही दिवस अगोदर दिसून येतात. आत्महत्या ही काही अचानक घडणारी घटना नाही. कारण आत्महत्या करणारी व्यक्ति ही सामान्यतः प्रथम आजारी पडते.

जागतिक आरोग्य संघटना २०१३ पासून जास्तीत जास्त आत्महत्या टाळल्या जाव्यात यासाठी समाजात आत्महत्यें विषयी जागृती निर्माण व्हावी, या विरुद्ध समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून दरवर्षी १० सप्टेंबर ला”जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस” साजरा करते. आत्महत्यें विषयी समाजात विशेष जागृती निर्माण व्हावी, यासाठी जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी एका घोष वाक्याची घोषणा करते. या वर्षीचे घोष वाक्य आहे ” Working together to prevent suicide” “आत्महत्या  प्रतिबंधासाठी एकत्र काम करू या”.
 
आत्महत्या टाळण्यासाठी काय कराल

“चिंता दहति सजीवं” कोणत्याही गोष्टी ची चिंता करणे सोडावे, त्याच त्याच गोष्टींचा पुनः पुनः विचार करणे सोडावे, येत असलेले नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करीत रहावे, मन आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करावा, शुद्ध हवेत रहावे, एखादा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्यास मित्राशी वा आपणास जी व्यक्ती योग्य वाटते त्याच्याशी त्या विषया संबधी चर्चा करावी, मन मोकळे पणाने मित्रांशी बोलावे, शवासन करावे, तात्पुरते बरे वाटते म्हणून कोणत्याही व्यसनाचा आधार घेऊ नये-व्यसन हे एखाद्या विषयाचे उत्तर नाही, मन सतत अन्य कोणत्याही चांगल्या विषयात गुंतवावे. योग्य व्यक्तीकडे समुपदेशन घ्यावे. मानसोपचार तज्ञा चा सल्ला घ्यावा.

आत्महत्या करणे हे नेहमीच चुकीचे व अविवेकी पाऊल आहे.
याविषयी प्रख्यात संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात–
“न लगे द्यावा जीव सहज चि जाणार।
    आहे तो विचार जाणा काही।।१।।—–
        तुका म्हणे कई होईल स्वहित।
         निधान जो थित टाकू पाहे।।३।।

रागामुळे किंवा मानसिक त्रासामुळे आपले अमूल्य जीवन संपवू नका. आत्महत्येंचा विचार करू नका, कारण आपला जीव कधीतरी जाणारच आहे. त्यापेक्षा जिवंत राहून समाजोपयोगी वा पारमार्थिक कार्य करा. जो जीवनाला निरर्थक समजून मरण मागतो तो गाढव आहे. याचा अर्थ एवढाच घ्यावा की, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला जीवनाचा, जगण्याचा अर्थच समजला नाही. लक्षात ठेवा,
जिंदगी वही है, जो आज हम जी रहे है।
कल जो जिएंगे, वह उम्मीद होगी-।।
“पैर” को लगनेसे “चोट” संभल कर चलना सिखाती है।
     और
  ” मन ” को लगनेवाली “चोट” समझदारी से चलना सिखाती है।

डॉ. अंकुश जाधव
माजी सहायक संचालक
(वैज्ञानिक४), केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, आयुष मंत्रालय, भारत सरकार.
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली).

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *