Talegaon Dabhade news: ऑनलाईन करभरणा करण्याची सुविधा त्वरीत सुरु करा : आमदार सुुुनिल शेेेेळकेे
Pckhabar-तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी नगरपरिषदेच्या वेबसाईटवरून ऑनलाईन करभरणा करण्याची सुविधा सुरु करावी, या मागणीचे निवेदन नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांना आमदार सुनिल शेळके यांच्या प्रतिनिधींनी दिले.
निवेदन आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने प्रतिनिधी गोकुळ किरवे, नबीलाल आत्तार, योगेश मोरे यांनी तळेगाव नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांना दिले.
आमदार सुनिल शेळके यांनी निवेदनात म्हटले आहे की, मिळकत कर भरण्याची मुदत 31 मार्च आहे. नगरपालिकेच्या वेबसाईटवरून ऑनलाईन करभरणा करण्याची सुविधा बंद असल्याने नागरिकांना नाईलाजास्तव नगर परिषद कार्यालयात जाऊन तास न तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्याबाबत अनेक नागरिकांकडून माझ्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शेवटच्या टप्यात कर भरण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढलेला असताना कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होणे, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने नागरीकांना ऑनलाईन कर भरण्याची सुविधा तातडीने चालू करावी.
कर भरण्यासाठी जास्त खिडक्या उपलब्ध करून द्याव्यात. कोरोनाच्या संकटामुळे अनेक नागरिकांचे रोजगार बंद झाले आहेत. त्यामुळे नागरिक सध्या आर्थिक अडचणीत आहे.
थकबाकीदारांना कर भरण्यासाठी पुरेशी मुदत वाढवून द्यावी. काही प्रमाणात हफ्त्यांनी थकबाकी भरण्याची सवलत द्यावी. यावर कोणत्याही प्रकारे विलंब शुल्क अथवा दंड आकाराला जाऊ नये आदी सूचना आमदार शेळके यांनी निवेदनात व्यक्त केल्या आहेत.










Leave a Reply