Talegaon Dabhade news: करवाढ नसलेले 220 कोटींचे अंदाजपत्रक सादर; बजेटला अनेक नगरसेवक गैरहजर

ही बातमी शेअर करा.

 

Talegaon Dabhade news: करवाढ नसलेले 220 कोटींचे अंदाजपत्रक सादर; बजेटला अनेक नगरसेवक गैरहजर
Pckhabar- तळेगाव दाभाडे नगर परिषदेने महत्वाच्या मुलभूत गरजांवर जादा निधीची तरतूद करणारे सुमारे 220 कोटीचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर केले. हे अंदाजपत्रक 28 लाख 65 हजार रुपये शिलकीचे असून यामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ व दरवाढ करण्यात आली नसल्याने नागरिकांना दिलासा देणारे हे अंदाजपत्रक आहे. मात्र, वार्षिक अंदाजपत्रकाला अनेक नगरसेवक उपस्थित नव्हते, त्यामुळे नगरसेवकांना शहर नियोजनाचे किती गांभीर्य आहे, हे दिसून येत आहे.

सन 2021-2022 अंदाजपत्रकाची विशेषसभा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली .सुरुवातीला गणसंखे अभावी सभा तहकुब करावी लागली. त्यानंतर लेखापाल अजित खरात यांनी अंदाजपत्रक सभेपुढे सदर केले. यावेळी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, तसेच विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांचे सह मोजकेच नगरसेवक सभेला हजर होते.
या अंदाज पत्रकामध्ये 220 कोटी 48 लाख 13 हजार 361 शिलकेसह जमा दाखविलेले आहेत. तर संपूर्ण वर्षासाठी 220 कोटी 19 लाख 47 हजार 500 रुपये खर्चासाठी तरतूद करण्यात आली आहे. या अंदाज पत्रकात अखेरची शिल्लक 28 लाख 65 हजार 861 रुपये दाखविण्यात आली आहे.

या वार्षिक अंदाज पत्रकात एकूण जमा कर वसुलीतून 20 कोटी 90 लाख 75 हजार, शासनाने वसूल केलेल्या करांचा हिस्सा 4 कोटी 80 लाख, महसुली अनुदानातून 11 कोटी 52 लाख, नगर परिषद मालमत्ता भाडेपोटी 70 लाख, सेवासुविधा 28 लाख 30 हजार, इमारत बांधकाम परवाने 9 कोटी 95 लाख, दंड व शास्तीकर 1 कोटी 60 लाख, विविध प्रकारचे फॉर्म विक्री 75 लाख 44 हजार, बँकव्याज 4 कोटी, थकीत करारील व्याज 1 कोटी 50 लाख, अनामत रकमेवरील व्याज 9 कोटी 50 लाख, बयाना व सुरक्षा अनामत व्याज 1 कोटी 10 लाख, इतर उत्पन्न महसुली जमा 62 कोटी 49 लाख रुपये दाखविण्यात आली आहे.

तसेच विशिष्ठ प्रयोजनासाठी येणारी शासकीय अनुदाने 109 कोटी 8 लाख आहेत. यामध्ये – वैशिष्ठपूर्ण अनुदान 10 कोटी, झोपडपट्टी पुनर्वसन 6 कोटी 60 लाख, रस्ते बांधणी अनुदान 3 कोटी 50 लाख, दलित वस्ती सुधारणा 2 कोटी, स्वच्छता अभियान 2 कोटी, नाग्रोत्थान अभियान जिल्हास्तर 7 कोटी, राज्यस्तर 55 कोटी, 15 वा वित्तयोग 10 कोटी, पाणी पुरवठा व भुयारी गटर लोकवर्गणी 4 कोटी 50 लाख, घनकचरा 6 कोटी, ठेकेदार बिलापोटी 3 कोटी 50 लाख रक्कम जमा होणार आहे.

या अंदाजपत्रकात अस्थापना खर्चावर 12  कोटी 91 लाख 96 हजार, कार्यालयीन खर्च 5 कोटी 13 लाख, सल्लागार व लेखा परीक्षण फी 7 कोटी 16 लाख, महिला बालकल्याण 2 कोटी 60 लाख, दिव्यांग 2 कोटी 60 लाख, दुर्बल घटक 2 कोटी 25 लाख, स्थिर मालमत्ता खर्च 5 कोटी 91 लाख, विद्युत विभाग 5 कोटी 35 लाख, पाणी पुरवठा विभाग दुरुस्ती 12 कोटी 70 लाख, एकून पुरवठादार वस्तू खरेदी बिले 6 कोटी 37 लाख, सर्व मजूर ठेकेदार 11 कोटी 67 लाख, उद्यान विभाग 2 कोटी 65 लाख, शिक्षण विभाग खर्च 1 कोटी 50 लाख, शाळा बांधकामे 10 कोटी, जमीन संपादन 11 कोटी,गटारे व नाले बांधकामे 48 कोटी 50 लाख, रस्ते व पदपथ बांधकामे 60 कोटी 37लाख, झोपडपट्टी पुर्नवसन 1 कोटी, घनकचरा व्यवस्थापन 3 कोटी, दुर्बल घटक बांधकामे 2 कोटी 25 लाख खर्च नमूद केला आहे.

सभेकडे अनेक मान्यवर नगर सेवकांनी पाठ फिरविली होती. सभागृहातील भारतीय जनता पक्ष, जनसेवा विकास समिती, आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते या सभेस उपस्थित नव्हते. तर अंदाजपत्रकाच्या चर्चेत सहभागी न होता, विशेष वाचन न करता या अंदाज पत्रकास मंजुरी देण्यात आली. या सभेत विरोधी पक्षनेते गणेश काकडे, संगीता शेळके, अरुण भेगडे, विभावरी दाभाडे, कल्पना भोपळे, संध्या भेगडे, मंगल जाधव, काजल गटे, प्राची हेंद्रे, निखील भगत, हेमलता खळदे, अनिता पवार, रोहित लांघे आदि उपस्थित होते.


ही बातमी शेअर करा.