Talegaon Dabhade crime news: तळेगावातील वनश्रीनगरमध्ये सशस्त्र दरोडा; वृध्द दाम्पत्याला कोयत्याच्या धाक दाखवून लुटले

ही बातमी शेअर करा.

Talegaon Dabhade crime news: तळेगावातील वनश्रीनगरमध्ये सशस्त्र दरोडा
Pckhabar- बंगल्याच्या खिडकीचे गज कापून वयोवृद्धांना हत्यारांचा धाक दाखवून हातपाय बांधून मारहाण करत 5 लाखांचा ऐवज चोरून नेला. ही  धक्कादायक घटना तळेगाव स्टेशन वनश्रीनगरमध्ये शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सेवानिवृत्त शिक्षक अर्जुन गोविंद शेटे (वय-73, रा.वनश्री नगर, तळेगाव चाकण महामार्गाजवळ, तळेगाव स्टेशन) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद  दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेटे व त्यांची पत्नी मीरा (71 वर्ष) हे वयोवृध्द दोघेच वनश्री भागात बंगल्यामध्ये राहतात. त्यांचा मुलगा अमेरिकेत तर त्यांच्या दोन मुली विवाहित असून त्या सासरी आहेत. नेहमीप्रमाणे रात्री 10 वाजता शेटे यांनी सर्व दरवाजे बंद करून आपल्या बेडरूममध्ये झोपले होते. पहाटे तीनच्या सुमारास खिडकीचे गज कापून तोंडाला मास्क आणि काळे कपडे घातलेल्या  20 ते 25 वयोगटाच्या 4 चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. वृध्द दाम्पत्याला हत्यारांचा धाक दाखवून, हातपाय बांधत मारहाण केली. पैसे, सोने कुठे आहे असे विचारणा करून कपाटातील 2 लाख 50 हजाराची रोकड, 40 हजार रुपयांची सोन्याची अंगठी, 1 लाख 60 हजार रुपयाचे सोन्याचे मंगळसूत्र, 8 हजार रुपयाच्या कानातील कुड्या, 5 हजार रुपयाची 3 घड्याळे, 3 हजार रुपयाची चांदीची भांडी, 3 हजार 500 रुपयाचा मोत्याचा हार 4 लाख 70 हजाराचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले.

फिर्यादी व त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी गोळा झाले. शेजार्‍यांनाही दोघांना सोडविले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, घटनास्थळी तळेगाव पोलीस स्टेशनाचे पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, शहाजी पवार, पोलीस उपायुक्त प्रेरणा कट्टे, संजय नाईक पाटील, आनंद भोईटे यांनी भेट देऊन तपासासाठी  पथके रवाना केली.


ही बातमी शेअर करा.