Maharashtra news: बांधकाम कामगारांना मिळणार गृहउपयोगी वस्तूंचा संच
आमदार लक्ष्मण जगताप यांचा पाठपुरावा
Pckhabar-पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर पाठीवर बिर्हाड घेऊन या बांधकाम साइटवरून त्या बांधकाम साइटवर स्थलांतर करणार्या बांधकाम कामगारांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे एक मोठा घरगुती आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सर्व नोंदित बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचा संच देण्याचा शासन आदेश जारी केला आहे. त्यानुसार नोंदित बांधकाम कामगारांना 17 प्रकारच्या 30 नग गृहउपयोगी वस्तू मोफत देण्यात येणार आहेत.
बांधकाम कामगार हा कायम स्थलांतरीत होत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी बांधकाम कामगार हा आयुष्यभर पाठीवर बिर्हाड घेऊन जगत असतो. आज या बांधकाम साइटवर, तर उद्या त्या बांधकाम साइटवर हा कामगार स्थलांतर करत असतो. हे करत असताना पोटासाठी लागणारे अन्न शिजवण्याची साधने सुद्धा त्याच्याकडे नसतात. ही बाब लक्षात घेऊन आमदार जगताप यांनी बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणार्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला संपर्क साधला. या मंडळाकडे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी शेकडो कोटी रुपये पडून आहेत. तरीही त्याचा विनियोग केला जात नाही. त्यामुळे आमदार जगताप यांनी मंडळाच्या सचिवांसोबत चर्चा करून नोंदित बांधकामगारांना गृहउपयोगी वस्तू देण्याची सूचना केली.
यासंदर्भात आमदार जगताप यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला लेखी पत्रही दिले. केवळ लेखी पत्र देऊन ते थांबले नाहीत, तर आमदार जगताप यांनी गेल्या सव्वा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा ठेवला. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, मंडळाने नोंदित बांधकाम कामगारांना 17 प्रकारच्या गृहउपयोगी वस्तूंच्या 30 नग मोफत देण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. 18 जानेवारी 2021 रोजी तसा शासन आदेशही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे हजारो नोंदित बांधकाम कामगारांना संसारासाठी मोठा आधार मिळणार आहे. बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य मिळावे यासाठी बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक जयंत शिंदे यांनी देखील आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामार्फत मोठा पाठपुरावा केला होता. या मागणीचा शासन आदेश निघाल्याने जयंत शिंदे यांनीही समाधान व्यक्त केले आहे. हे सर्व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळेच शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.










Leave a Reply