Article: भिती…बालमनावरचे जोखड !

Article: भिती…बालमनावरचे जोखड !

लायन अशोक येवले
Pckhabar- लायन्स क्लब्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ च्या कौशल्य विकास प्रकल्प अंतर्गत २१ एकदिवसीय कार्यशाळांच्या माध्यमातून आम्ही शाळा व कॉलेजच्या ३८०० विद्यार्थ्यांशी व्यक्तिशः संपर्क साधू शकलो.
यामध्ये प्रकर्षाने जाणवली ती विद्यार्थ्यांच्या मनातील भिती. या भीतीमुळे ते कुठल्याही चर्चेत मनमोकळेपनाने सहभागी होत नाही असे जाणवल्यावर आम्ही छोट्या खेळाच्या रूपाने त्यांच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न केला.

प्रत्येक विद्यार्थ्याने मला कशाची भिती वाटते ते एका कागदावर लिहून आम्हाला दिले.
त्यातील काही प्रकार असे ;
१)अंधाराची भिती
२)प्रेताची भिती
३)उंचीची भिती
४)पाण्याची भिती
५)इलेक्ट्रिक वायरिंगची भिती
६)परीक्षेत नापास होण्याची/कमी मार्क मिळण्याची भिती
७))सरांची भिती
८)जग काय म्हणेल त्याची भिती
९)चुकीचे उत्तर दिले तर सगळेजण हसतील त्याची भिती
१०)मन हेलावून टाकणारे…आईची भिती
याचे तीन विभागात विवेचन करता येईल.
१) प्रेमापायी भिती
प्रेत अथवा अंधार या बाबतीत पालकांकडून मुलांवर भीतीचे संस्कार झाले. पूर्वी प्रेतामुळे रोगराई पसरण्याच्या भीतीतून भूताची भिती बालकांवर बिंबवली गेली.
अंधारात साप, विंचू, काटा यांच्या भीतीतून अंधाराचा बागुलबुवा मुलांच्या मानगुटीवर बसला.
२) अतिधाडस /अतिउत्साह….
सुरक्षिततेचे नियम न पाळल्यामुळे एखाद्याचा मृत्यू बघितल्यानंतर त्या भीतीचा पगडा मुलांवर होऊ लागतो. ट्रेकिंच्या वेळी झालेला अपघाती मृत्यू, इलेक्ट्रिक शॉकमुळे झालेला अपघाती मृत्यू अथवा रस्त्यावरील अपघातात झालेले मृत्यू मुलांच्या मनावर खोल जखम करून जातात. सुजाण पालकांनी मुलांना कारण मिमांसा करून समजाविल्यास मुलांमधील भिती दूर होऊ शकते.
3)परीक्षा /मार्क /पास नापास,
अभ्यासाच्या चार पायऱ्या…शिक्षण, शिकलेले आत्मसात करणे, सराव व कसोटी यांची नीट सांगड न घातल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. या चारही पायऱ्यांचे महत्व मुलांना समजावून सांगितल्यास भिती नाहीशी होऊ शकते.
४)परस्पर नातेसंबंध..आईची भिती माझ्या मनाला स्पर्श करून गेली. आई व मुलगा अथवा मुलगी याहून सुंदर नाते असू शकत नाही या समजाला त्या दिवशी तडा गेला. हा चर्चेचा विषय नसून समोपनाचा आहे या जाणिवेतून त्या मुलीला प्रेमाने दोन गोष्टी समजावून सांगितल्या.
घरून निघतांना व घरी पोहचल्यावर आईला घट्ट मिठी मारायची व म्हणायचे की तुझ्या इतकी प्रेमळ आई जगात नाही. एक महिन्यानंतर त्याच मुलीचा फोन येतो,की आई आणि मुलगी यांच्या इतके प्रेमाचे नाते जगात नाही.

परस्पर विश्वास आणि निरपेक्ष प्रेमाचा अनुभव परस्पराबद्दल भीतीतून प्रेमाचे नाते निर्माण करू शकतात हे निर्विवाद सत्य आहे.

माझी सुजाण पालकांना नम्र विनंती आहे की त्यांनी मुलांना प्रेमाने भीतीतून बाहेर काढणे जरुरीचे आहे. नाहीतर भीतीचे जोखड मुलांची प्रगती रोखण्याचे कारण बनू शकते.

– लायन अशोक येवले
लायन्स क्लब ऑफ पूना निगडी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *