Dehu News : आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभंग स्कूलमध्ये वारी, अभंग पठण स्पर्धा उत्साहात संपन्न

Dehu News : आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभंग स्कूलमध्ये वारी, अभंग पठण स्पर्धा उत्साहात संपन्न

Pckhabar- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्राथमिक विभागाने अभंग पठण स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन केले होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी गुरुवार, दि. ३ जुलै रोजी घेण्यात आली होती. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी शनिवार, दि. ५ जुलै रोजी घेण्यात आली. ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली. प्रथम गटांत इ. तिसरी व चौथी साठी ५ अभंग ठेवण्यात आले होते. द्वितीय गटांत इ. पाचवी, सहावी आणि सातवी साठी १० अभंग पठणासाठी देण्यात आले होते. स्पर्धकांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत, टाळ व तबल्याच्या साथीने भक्तिमय वातावरणात अभंगांचे उत्तम सादरीकरण केले. अभंगांच्या सादरीकरणासाठी इ. सातवीतील कौस्तुभ लिंभोरे याने तबलावादकाची उत्तम भूमिका निभावली.

इंग्रजी माध्यमातील मुले असूनही अभंगांचे स्पष्ट उच्चार, पाठांतर खूप सुंदर होते. अभंगांचे पाठांतर न करता मुले आज स्वतः तुकाराममय झाले होते, असे मत परीक्षक म्हणून लाभलेल्या श्रीक्षेत्र देहू येथील वारकरी शिक्षण संस्थेतील शिक्षक हभप प्रभाकरमहाराज गाडेकर यांनी व्यक्त केले. पूर्व प्राथमिक विभागातील सहशिक्षिका श्रुती अत्रे यांनीही परीक्षकाची भूमिका बजावली.

प्रत्येक विद्यार्थ्याचे किमान १० अभंग पाठ असावेत, हा या अभंग पठण स्पर्धेचा उद्देश होता आणि जवळपास ४३ अंतिम फेरीतील पात्र स्पर्धकांनी तो फलद्रुप केला.

शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्पर्धेतील विजेते घोषित केले. इ. चौथीतील सई सागर गाडे प्रथम क्रमांक, इ. तिसरीतील शिवम मंगेश हगवणे द्वितीय क्रमांक तर इ. चौथीतील सोहम राजेंद्र हराळे याने लहान गटातून तृतीय क्रमांक मिळविला. मोठ्या गटातून इ. पाचवीतील ओवी दुष्यंत काळोखे प्रथम क्रमांक, श्लोक अविनाश भंडारे द्वितीय क्रमांक तर आरोही विपुल जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावला.

सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद , सचिव प्रा. विकास कंद, प्राथमिक विभागाच्या उपप्राचार्या शैलजा स्वामी यावेळी उपस्थित होते.

इ. पहिली व दुसरी तील चिमुकल्यांनी शाळेच्या प्रांगणात वारीचा आनंद लुटला. वारकऱ्यांच्या वेशभूषेतील हे लहान वारकरी टाळांच्या गजरात लाडक्या विठूरायाच्या नामघोषात दंग झाली. चिमुकल्या पावलांनी फुगड्या घालून फेर धरला. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या गजरात, आनंदाचे डोही आनंद लहरी उमटवत लहानगेदेखील पालखी सोहळ्यात रममाण झाले. श्री विठ्ठल, ज्ञानोबा व तुकोबांच्या आरतीने वारीची सांगता करण्यात आली.

सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख वृषाली आढाव यांनी अभंग पठण स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतले. सहशिक्षिका रेखा अडागळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *