Article By Dr Ankush jadhav: पर्यावरण आणि मनुष्य

Pckhabar- ” पर्यावरण संरक्षण व वातावरणातील स्वच्छता” हा संदेश जगभर जाऊन समाजात, देशात या विषयी जागृती निर्माण व्हावी. यासाठी दरवर्षी 5 जून ला “जागतिक पर्यावरण दिवस” जगभर साजरा केला जातो. याची सुरवात ५ जून १९७३ पासून झाली. यात १४३ देश सहभागी होतात.
पर्यावरण हा शब्द “परि” व “आवरण’ या दोन शब्दांनी बनला आहे. ”

सामान्यतः पर्यावरणात सभोवतालचे वातावरण, हवामान, स्वच्छता, झाडे, प्रदूषण इ.गोष्टींचा समावेश होतो. नैसर्गिक प्रदूषण म्हणजे झाडांची,
वनस्पतींची कमी होत जाणारी संख्या. यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा परिणाम सर्वच सजीव विशेषतः मानवी शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो.
Healthy surrounding makes healthy people, पर्यावरण अर्थात सार्वजनिक आरोग्य चांगले असेल तर लोक निरोगी राहतील,हे जागतिक आरोग्य संघटनेने १९५२ सलीच घोषित केले आहे.
मनुष्य व पर्यावरण हे एकमेकांवर अवलंबून आहेत.
मानवी जीवन स्वस्थ्य,
आरोग्यपूर्ण व स्वच्छंद होण्यासाठी, जगण्यासाठी प्रदूषण मुक्त वातावरणाची अत्यंत आवश्यकता असते. परंतु विकासाच्या नावाखाली सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केले. परिणामी सर्वच प्रकारच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली. परंपरागत काचऱ्याबरोबरच टी. व्ही., मोबाईल इ. सारख्या ई कचऱ्याची निर्मिती व वाढ मोठया प्रमाणावर झाली असून ही एक नवीन समस्या निर्माण होऊन या सारख्या वाढत्या प्रदूषणामुळे वातावरण अस्वच्छ, प्रदूषित झाले. आयुर्वेद शास्त्रात (वायु:,उदकं:, देश:काल इ./)वायू, पाणी, देश-भूमी व काळ हे दूषित झाल्यास त्याचा परिणाम सर्व प्रकारच्या सजीवांवर होऊन अनेक प्रकारच्या संक्रमक रोगांचे प्रमाण वाढते, हे स्पष्ट केले आहे. दुर्दैवाने आज हेच झाले आहे. तीन वर्षांपूर्वी न दिसणाऱ्या करोना विषाणूने सर्व जगाला मेटाकुटीला आणले होते व आज ही याची भीती पूर्ण संपली नाही. लाटांवर लाटा येत राहिल्या. पहिली संपली म्हणून थोडा श्वास सोडला तर दुसरी आली व आता तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. यात लाखो लोक मेले,काहीं त्यातून बरे झाल्यावर त्यांच्यात अन्य दुष्परिणाम झालेले दिसून आले.

या वर्षीच घोष वाक्य आहे” प्लास्टिक प्रदूषणाला हटवूया,
त्यावर उपाय करूया”
वायू प्रदूषणाशी संबंधित कारणामुळे दरवर्षी अंदाजे सात दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. दरवर्षी ४०० दशलक्ष टनापेक्षा अधिक प्लास्टिक चे उत्पादन केले जाते. फक्त १०टक्के प्लास्टिक चा पुनर्वापर केला जातो बाकी प्लास्टिक नद्या, नाले, समुद्र यात फेकले जाते. त्यामुळे जग प्लास्टिक मय होत आहे. त्याचा प्रचंड परिणाम वातावरणावर होत असून वातावरणातील प्रदूषण वाढत आहे.

संक्रमक रोगांच्या विरुद्ध जनजागृती निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने १९५६ साली Destroy disease carrying insects. रोग संक्रमण करणाऱ्या कीटकांचा नायनाट करा असा संदेश दिला होता. परंतु इतक्या वर्षानंतर ही आज काय स्थिती आहे.?दूषित, अस्वच्छ मुळे कीटकांचा नायनाट राहिला दूरच उलट त्याचे प्रमाण वाढले. याही पूर्वी१९५३ साली जागतिक आरोग्य संघटनेने “आरोग्य हीच संपत्ती”(Health is wealth) हे घोष वाक्य जाहीर केले होते. परंतु आरोग्य ही संपत्ती केव्हा?आजूबाजूचे वातावरण स्वच्छ, निरोगी असेल तेव्हा. ते जर अस्वच्छ असेल तर वैयक्तिक आरोग्य कितीही चांगले ठेवले तरी सार्वजनिक अस्वच्छतेचा परिणाम हा वैयक्तिक आरोग्यावर ही होतोच. ही वस्तुस्थिती व वास्तव आहे.

करोना च्या महासाथीत हे सर्वच प्रश्न उपस्थित होते व आहेत. करोना ला किती ही प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला तरी तो पूर्ण नष्ट होणार नाही व यारखे नवीन रोग येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अनेक तज्ञ म्हणू लागले आहेत.

यासाठी एकच उपाय आरोग्य व स्वच्छतेसाठी एकत्रित प्रयत्न करणे. आपली स्वतः ची,घराच्या स्वच्छतेची काळजी स्वतः च घेणे.प्रत्येक व्यक्तीने आपली स्वतः ची, आपल्या घराची काळजी स्वतः घेणे,विविध झाडे लावणे, व पर्यावरण प्रदूषण मुक्त करण्याचा श्री गणेशा स्वतः पासून करून करोना पासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे. कारण आपल्या व समाजाच्या आरोग्यासाठी स्वच्छते बरोबर च,वातावरण ही स्वच्छ असणे अत्यंत महत्वाचे आहे.

स्वच्छ पर्यावरणाने जीवाणू, विषाणू, अपायकारक कीटक नष्ट होऊन करोना, फ्लू इ.सारखे संक्रमक रोगांसहित अन्य सर्व प्रकारचे रोग होण्याची फार कमी असते व झालेच तर त्यांची तीव्रता फार कमी असते.
“पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्लास्टिक ला हटवूया व त्यावर उपाय करून प्रदूषण मुक्त होऊन निरोगी आयुष्य जगूया”
डॉ. अंकुश जाधव
लेखक, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे सेवानिवृत्त सहायक संचालक आहेत.