Article By Dr. Ankush Jadhav : कोरोना तिसरी लाट व ओमायक्रॉन संसर्ग

Article By Dr. Ankush Jadhav : कोरोना तिसरी लाट व ओमायक्रॉन संसर्ग

Pckhabar- जगभरात तिसऱ्या लाटेच्या
पार्श्वभूमीवर सध्या एकूण २७ लाख लोक कोरोनाबाधित असून भारतात ही संख्या ४ लाख ७२ हजार आहे. एकूण कोरोनाबधितांच्या तुलनेत सक्रिय रुग्णांचे प्रमाण १.३४% आहे. १ ते १५ फेब्रुवारी च्या दरम्यान कोरोनाबधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल असा अंदाज वर्तविला जात आहे. ओमायक्रॉनच्या संसर्गाचे मुख्य स्थान घसा असून यामुळे फुफ्फुसांना धोका कमी असल्याने फुफ्फुसाच्या आरोग्यावर हा विषाणू थेट परिणाम करीत नसल्याने ओमायक्रॉन संसर्गाची गुंतागुंत कमी राहणार आहे असे जगभरातील संशोधनातून दिसून आले आहे. यामुळेच घशातील संसर्गाच्या कारणाने संक्रमणाचा वेग वाढेल. परंतु त्याचा फुफ्फुसांवर परिणाम होत नसल्याने संसर्गाची तीव्रता कमी राहील. तसेच सर्व कोरोना उत्परिवर्तनाच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या वाढीचा वेग पाच पट असला तरी त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत नाही ,असे ही दिसून आले आहे. याउलट डेल्टा विषाणू थेट फुफ्फुसांवर परिणाम करीत होता . परिणामी रुग्णांमध्ये न्यूमोनिया व अन्य श्वसनविकारांचे प्रमाण प्रचंड होते. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊन अनेक रुग्णांचा मृत्यू झाला.

असे जरी असले तरी म्हणजेच ओमायक्रॉनचा संसर्ग घशापुरताच मर्यादित रहात असल्याने जरी जीवाला धोका कमी असला तरी ज्यांना मधुमेह,मूत्रपिंड विकार,रक्तदाब, दम्यासारखे श्वसन विकार इ.असलेल्यांनी तसेच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे,ज्यांचे लसीकरण झाले नाही .अशा सर्वांनीच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो,तो म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेऊन ही कोरोना का होतो?
पोलिओ सहित काही रोगांसाठी लसी दिल्या जातात. ते रोग निर्माण करणारे विषाणू,जिवाणू आज ही शरीरात प्रवेश करतात. परंतु लस घेतली असल्याने ते काहीही करू शकत नाहीत. व्हायरुलन्स व व्हारल लोड यात फरक आहे. व्हारल लोड होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. परंतु व्हायरुलन्स म्हणजे विषाणूंची आपल्याला आजारी पाडण्याची क्षमता. लस नेमके हेच काम करते. ती विषाणूंची घातक क्षमता कमी करते. परिणामी आजार तीव्र न होता सौम्य होतो व पुढील धोका टळतो. लस हा उपाय नसून तो ही एक प्रतिबंधक उपाय आहे.

आपल्या शरीरात कोट्यवधी जीवाणू व विषाणू आहेत.ते सर्वच घातक नसतात. कोणताही आजार होऊन तो बरा करण्यापेक्षा तो होऊच न देण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. समतोल आहार घ्या. पिण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. योग्य झोप घ्या. चायनिज,इन्स्टंट पदार्थ खाण्याचे टाळा. आज गावो गावी चायनिज पदार्थांचे स्टॉल दिसून येतात. हे घातक आहे.

साधारण ताप, अंगदुखी,घसा खवखवणे वा दुखणे, खोकला, मळमळ,
अशक्तपणा इ. लक्षणे दिसत असल्यास
संशमनी वा गुडूची घन वटी, महासुदर्शन वटी वा काढा, त्रिभुवन कीर्ती रस, सितोपलादी चूर्ण इ.औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू करावीत.
तोंडात लवंग, खडी साखर वा ज्येष्ठ मधाची कांडी धरावी.
मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. या उपायांनी ३/४ दिवसात बरे न वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व पुढील उपाय करावेत.

सर्वच कोरोना संसर्गा साठी
1)योग्य प्रकारे मास्क वापरा.
2)दोन व्यक्तीत योग्य अंतर ठेवा.
3)गर्दीत जाणे टाळा.

या प्रतिबंधक उपायांचे पालन करा.

सर्दी,खोकला, शिंका आल्या म्हणजे कोरोना झाला असे समजू नका.तो वातावरणाचा परिणाम ही असू शकतो.
म्हणून घाबरू नका काळजी घ्या.

डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *