Delhi News : गाझियाबादमध्ये साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा

Delhi News : गाझियाबादमध्ये साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची पाहणी


Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी, बोऱ्हाडेवाडी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसविला जाणार आहे. मूर्तीकार राम सुतार यांच्या दिल्लीचे उपनगर असलेल्या गाझियाबाद येथील कार्यशाळेत हे शिल्प तयार केले जात आहे.

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील नगरसेवकांनी या कार्यशाळेला भेट देत, या कामाची पाहणी केली. येत्या काही महिन्यात पुतळा पूर्ण होऊन याठिकाणी उभारणी करण्याचे काम सुरू होणार आहे. मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा शंभर फुटी पुतळा उभा करण्यात येणार आहे.

शंभूराजांचा व देशातील सर्वात मोठा पुतळा उभारण्याचा मान पिंपरी चिंचवड शहराला मिळणार आहे. या पुतळ्याचे शिल्पकार होण्यासाठी देशातील मानांकित शिल्पकारांनी इच्छा व्यक्त केली होती. गुजरात येथील ‘ स्टॅच्यू ऑफ युनिटी ‘ सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा साकारणारे शिल्पकार राम सुतार हे या पुतळ्याची निर्मिती करत आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात बोऱ्हाडेवाडी येथे सुमारे 100 फुट उंचीचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा व 40 फुटी चौथरा व संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित म्युरल्सद्वारे जीवनपट उलगडण्यात येणार आहे.

यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *