Dehu News: देहूगाव परिसरात धोका वाढतोय, 55 सक्रिय कोरोना रुग्ण !

Dehu News: देहूगाव परिसरात धोका वाढतोय, 55 सक्रिय कोरोना रुग्ण !
Pckhabar- देहूगाव परिसरात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे.  काल (शुक्रवार) एका दिवसात 21 नवे रूग्ण आढळून आले असून एकूण 55 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव यांनी दिली.

देहूगाव परिसरात अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत. विना मास्क फिरत आहेत, सुरक्षित अंतराचे पालन करत नाहीत, यासह नागरिक शासनाने दिलेले नियमांचे पालन करत नसल्याने दिसून येत आहे.  विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहेत.

देहुगाव परिसरात शुक्रवारअखेर दोन हजार 374 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 2 हजार 285 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे.  55 रुग्ण सक्रिय असून यामधील काही रुग्ण कोविड सेंटरमध्ये, गृह विलगीकरणात तर काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

पुढील एक- दिड महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ञांनी आणि देशाच्या टास्क फोर्सने व्यक्त केला आहे.  त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून विना कारण बाहेर फिरू नये. मास्क आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव यांनी केले आहे. तसेच ज्यांना यापूर्वी कोरोना होऊन गेला आहे, त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असेही डॉ. यादव म्हणाले.