Article By Dr. Ankush Jadhav : वांगं व गैरसमज
Pckhabar-वांग्याबद्दल जेवढ्या गैरसमजुती आहेत, तेवढ्या अन्य कोणत्याही आहारीय पदार्थांविषयी नाहीत. जखम झाली, शस्त्रक्रिया झाली, आजारपण आले की, वांगं खाऊ नकोस हेच सर्वजण सांगतात. कारण वांगं वातुल म्हणजे शरीरात वातदोष वाढविणारे आहे. वास्तविक वांग हे फारसे वातुल नाही तर शरीरातील वात, पित्त व कफ हे तिन्ही दोष नाशक आहे. वांग हे रसाने कटू( तिखट), वीर्याने उष्ण, विपकाने कटू, गुणाने लघु, तीक्ष्ण असून ते कफ व वात दोष नाशक तर किंचित पित्त दोष वाढविणारे आहे. वांग्याबद्दल भावप्रकाश आणि वाग्भट यांनी आपल्या ग्रंथात वर्णन केले आहे.
वांग हे जगभरातील लोकांची आवडती भाजी आहे. कारण वांग्याचे अनेक पदार्थ करता येतात. उदा. सुखी व पातळ भाजी, भरीत, भरलेली वांगी, वांगे भात, वांगे पोहे, वांगी भजी, वांगे काप इ.
वांगे हे मूळचे भारतीय.
तेराव्या शतकात युरोपला त्याची ओळख झाली. तेथून ते चीन, इराणला गेले.आज भारतासह चीन, मलाया, इंडोनेशिया, ब्रम्हदेश (म्यानमार), आफ्रिका, अमेरिकेतील काही भाग इ. अनेक देशात याची लागवड केली जाते. ज्या भूमीत त्यांची लागवड केली जाते, त्यानुसार त्यात गुणधर्म व चव उत्पन्न होते. कृष्णाकाठची काटेरी वांगी चवदार असतात म्हणून ती लोकप्रिय आहेत. आता यात पण संकरित जाती आल्या आहेत.
१०० ग्राम वांग्यात पुढीलप्रमाणे घटक आसतात.
आर्द्रता(पाणी)-९२.७%, प्रथिने-०.४%, मेद-०.३०%, खनिजे-०.३, कॅल्शियम-१८मि. ग्रा.,
फॉस्फरस-४७मि. ग्रा.,
लोह-०.९मि. ग्रा., कॅरोटीन-७४मि. ग्रा.,”क”जीवनसत्व-१२मि. ग्रा., थायमिन-०.०४मि. ग्रा.,
तंतुमय पदार्थ-१.३% व पिष्टमय पदार्थ-४.०%, कॅलरी मूल्य-२४.
वांगं हे पचनास हलके, भूक व वीर्य वाढविणारे, हृदयाला हितकर असून पोट साफ करणारे आहे. कोवळे वांगे पित्त व कफ दोष नाशक तर जून किंचित पित्त दोष वाढविणारे आहे. विस्तवावर भाजलेले वांगे किंचित पित्त दोष वाढविणारे असून ते कफ, मेद, वात व आमदोष कमी करणारे आहे. पचनास हलके व भूक वाढविणारे आहे.
यकृताच्या अनेक तक्रारींवर वांग्याचा उपयोग होतो. यासाठी सतत पंधरा दिवस कोणताही मसाल्याचा उपयोग न करता वांगी खावीत. वांग्याच्या पानात आचके थांबविण्याचा गुण आहे. खोकला, छातीत कफ अडकणे यावर पानांचा अर्धा चमचा रस घेऊन त्यात थोडा मध मिसळून दिवसातून दोन/ तीन वेळा द्यावा. गर्भपातावर वांगे उपयोगी आहे. जांभळी वांगी उकडून महिनाभर घ्यावीत. याने “ई” जीवनसत्व शोषून घेण्याची शक्ती वाढते. प्रोजेस्टेरॉन या अंत:स्त्रावाचे प्रमाण वाढते. डॉ. संन्याल यांच्या मतानुसार १ ग्राम वांग्याच्या बिया सतत तीन दिवस लागोपाठ खाल्ल्यास शरीरात देवी, गोवर, कांजण्या यांच्या विरोधात शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
वांगी घेताना त्यावर डाग पडलेली घेऊ नयेत. हिरवट वांगी जास्त प्रमाणात खाल्ल्यास अॅसिडिटी होते. ज्यांची पित्त वा उष्ण प्रकृती आहे त्यांनी तसेच पावसाळ्यात वांगी कमी प्रमाणात खावी.
डॉ.अंकुश जाधव









Leave a Reply