Chinchwad News : थरमॅक्स चौकात गोरगरिबांसाठी अन्नदान यज्ञ ; दररोज तीन हजार कष्टकऱ्यांना मोफत जेवण

ही बातमी शेअर करा.

Chinchwad News : थरमॅक्स चौकात गोरगरिबांसाठी अन्नदान यज्ञ ; दररोज तीन हजार कष्टकऱ्यांना मोफत जेवण
Pckhabar-कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, वर्किंग पीपल्स चॅटर इंडिया  आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या कम्युनिटी किचनच्या वतीने दररोज सुमारे  तीन हजार नागरिकांना मोफत अन्नदान करण्यात येत आहे. २५ मेपासून सुरू झालेले अन्नदान यज्ञ ५ जुलैपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती उपक्रमाचे  मुख्य संयोजक काशिनाथ नखाते यांनी दिली.

चिंचवड येथील थरमॅक्स चौक येथे हे अन्न वितरण केंद्र उभारण्यात आले आहे. येथून शहरातील निगडी, भोसरी, आकुर्डी, चिंचवडगाव, पिंपरी, काळेवाडी, नेहरूनगर, चिखली अशा एकूण दहा  परिसरामध्ये  मागणीनुसार रिक्षाद्वारे  जेवणाचे डबे पोहचले  जात आहेत. या अन्नदान कार्यात महासंघाचे सुमारे ८० कार्यकर्ते  सहभागी आहेत. या कार्यकर्त्यांच्या  योग्य समन्वयातून  दररोज मोफत अन्नदानाचे योग्य प्रकारे नियोजन केले जाते. यामध्ये राष्ट्रीय किमान वेतन आयोगाचे सदस्य चंदन कुमार, कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश संघटक अनिल बारवकर, उपाध्यक्ष राजेश माने, माध्यम प्रमुख उमेश डोरले, इरफान  चौधरी , धर्मेंद्र पवार, माधुरी जलमुलवार,  राणी माने, विजया पाटील,  सीमा शिंदे, शंकर साळुंके, सिद्धनाथ देशमुख, संजय कांबळे, निरंजन लोखंडे, तुकाराम माने, राजू बोराडे आदी  पाच समित्या कार्यरत आहेत. या  पाच समित्यांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत जेवणाचे डबे   वितरित केले जातात.

कोरोना कालावधीमध्ये अनेक कष्टकरी कामगारांचे हातचे काम बंद झाले आहे. छोटे- मोठे व्यवसाय बंद पडले आहेत.   कष्टकऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला   दिला नाही. अशा परिस्थितीमध्ये जगण्याचा प्रश्न कष्टकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. अशा बिकट परिस्थितीत या कष्टकऱ्यांना जगविण्यासाठी  त्यांना पुन्हा सन्मानाने उभे करण्यासाठी हा मोफत अन्नदान यज्ञ सुरु केला आहे.

थरमॅक्स चौकात उभारण्यात आलेल्या  मंडपातून अन्नदान केले जाते. आजपर्यंत प्रसिद्ध  पार्श्वगायक आनंद शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, माजी  नगरसेवक मारुती भापकर,  आशिष शिंदे,  सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, कवी सुरेश कंक, पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष काळूराम कवितके, संवाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरीश  मोरे, महापालिका नागरवस्ती विभागाचे निवृत्त अधिकारी  संभाजी ऐवले आदी मान्यवरांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले.

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते म्हणाले” कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या सुमारे वीस कष्टकरी कामगारांना या  उपक्रमामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे एकीकडे मोफत अन्नदान करून गरजूंना मायेचा घास भरविला जात असताना वीस महिलांच्या रोजगाराचाही  प्रश्न मार्गी लागला आहे. पाच जुलैपर्यंत हा अन्नदान यज्ञ सुरु राहणार आहे. गरज पडल्यास आणखी महिनाभर तो सुरु ठेवला जाईल”.


ही बातमी शेअर करा.