Article By Dr. Ankush Jadhav : कोरोना-पहिल्या व दुसऱ्या लाटेतील फरक

Article By Dr. Ankush Jadhav : कोरोना-पहिल्या व दुसऱ्या लाटेतील फरक

Pckhabar- गेले दीडवर्षं कोरोनाच्या महासाथीने जगभर थैमान घातले असून माणसालाही माणसातून उठवले आहे. जगातील प्रत्येक गोष्टीवर या महासाथीचा परिमाण झाला आहे. याची  लाट  आता संपली असा सुस्कारा सोडत असतानाच दुसरी लाट आली व पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू झाले. जगात आजपर्यंत १७ कोटी १९ लाखापेक्षा अधिक लोक यामुळे बाधित झाले तर ३५ लाख ७६ हजारापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. भारतात २ कोटी ८४ लाखापेक्षा अधिक लोक याने बाधित झाले तर ३ लाख ३८ हजार पेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात ५७ लाख ७६ हजारापेक्षा अधिक कोरोना बधितांची संख्या असून ९६ हजारापेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत.
गुरुवारी १५ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले.

आपण महाराष्ट्रातील कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा विचार करू. आतापर्यंत दिसून आले आहे की, कोरोनाची पहिली लाट ही ज्येष्ठांसाठी घातक होती. कारण ज्येष्ठ लोक मोठ्या प्रमाणात बाधित झाले व त्यांचे मृत्यू जास्त प्रमाणात झाले तर दुसरी लाट ही तरुणांसाठी घातक होती. यात तरुण जास्त बाधित होऊन त्यांचे मृत्यूचे प्रमाण जास्त होते.

महाराष्ट्र राज्यात ९ मार्च २०२० रोजी  पुण्यात  कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. महाराष्ट्रात मार्च २० पासून पहिली लाट सुरू झाली व ती डिसेंबर २० मध्ये ओसरली. या लाटेत महाराष्ट्रात कोरोना बधितांची संख्या १९ लाख ३२हजार पेक्षा अधिक होती. या काळात एकूण मृत्यू ४९,५२१ इतके होऊन मृत्यदर २.५६ होता.

कोरोनाची दुसरी लाट जानेवारी २०२१ ला सुरू झाली व २४ मे पर्यंत कोरोना बधितांची संख्या ३६ लाख ६९ हजार पेक्षा अधिक होती. या काळात एकूण मृत्यू ३९, ६९१ झाले तर याचा मृत्यदर १.०८ इतका होता. यावरून लक्षात येईल की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना बधितांची संख्या पहिल्या लाटे पेक्षा दुप्पट झाली. पहिली लाटेचा कालावधी हा १० महिन्याचा होता तर दुसऱ्या लाटेचा कालावधी हा केवळ ५ महिन्याचा आहे तरी ही बधितांची संख्या ५ महिन्यात दुप्पट झाली.

दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढली असली तरी मृत्यू दर मात्र खूपच कमी झाला आहे. तो २.५६ वरून १.०८ वर आला आहे. पहिल्या लाटेत महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्यात मृत्यदर १ टक्के पेक्षा कमी नव्हता तर दुसऱ्या लाटेत मृत्यूदर १ टक्क्यापेक्षा कमी असलेले ७ जिल्हे आहेत. पहिल्या लाटेत सर्वात कमी मृत्युदर १.०२ टक्के गडचिरोली जिल्ह्यात तर दुसऱ्या लाटेत बुलढाणा जिल्हा मध्ये ०.३८ टक्के इतका होता. १० महिन्याच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या ५ महिन्याच्या लाटेत मृत्य अधिक असले तरी ज्या प्रमाणात वा झपाट्याने रुग्ण वाढले त्यामानाने मृत्यू झाले नाहीत हे आकडेवारी वरून दिसून येते.

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत गर्भवतीं स्त्रियांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रसार अधिक होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच पहिल्या लाटेत बहुतांश गर्भवती स्त्रियांमध्ये कोरोना कोणतीही लक्षणे नव्हती वा सौम्य होती तर दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रतेबरोबरच मृत्यू दर ही वाढला असल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील नायर रुग्णालयाच्या आकडेवारी नुसार, पहिल्या लाटेत ७०० कोरोना बाधित गर्भावतींवर उपचार केले होते. तेव्हा कोणत्याही गर्भवती ला प्राणवायू द्यावा लागला नव्हता. परंतु दुसऱ्या लाटेत सदर रुग्णालयात दाखल झालेल्या ४०० गर्भवतीं पैकी १२० गर्भावतींना प्राणवायू देण्याची आवश्यकता भासली. दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढूनही  जास्त मृत्य झालेत नाहीत याचे कारण राज्य शासनाने वाढवलेल्या खाटा, प्राणवायू ची केलेली उपलब्धता इ. सर्व प्रकारची केलेली तयारी, वाढविलेली चाचण्याची संख्या, टास्क फोर्स चे योग्य मार्गदर्शन, सतर्क झालेले लोक इ. महत्त्वाच्या गोष्टींना आहे.

तज्ज्ञांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, नागरिकांनी घाबरू नये, पण सतर्क रहा. तुम्ही लस घेतली असाल, मजबूत असाल तरी योग्य प्रकारे मास्कचा वापर करा, दोघात योग्य अंतर ठेवा, मुद्दाम गर्दीत जाऊ नका, वारंवार हात धुवा. याचा आपण सर्वानीच योग्य प्रकारे अवलंब केला तर तिसऱ्या संभाव्य लाटेतून ही सहजपणे निसटून जाऊ. यात शंका नाही.

    डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *