नागरिकांनी बांधून ठेवलेल्या चोरट्याचा मृत्यू
Pckhabar- चोरटा घरात घुसल्याने आरडाओरडा केल्यानंतर जमलेल्या नागरिकांनी चोरट्याला साखळीने बांधून ठेवले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. चोरट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. ही घटना आज (मंगळवार) सकाळी भोसरी येथे घडली.
संतोष हायसे (वय 30, पत्ता माहिती नाही) असे मृत्यू झालेल्या चोरट्याचे नाव आहे.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संतोष हा मंगळवारी सकाळी भोसरीतील एका घरात घुसला. त्या घरातील नागरिकांनी आरडा-ओरडा केला. त्यानंतर जमा झालेल्या नागरिकांनी त्यास मारहाण केल्याचे समजते. नागरिकांनी संतोषला साखळीने बांधून ठेवले. दरम्यान तो बेशुद्ध झाला. बेशुद्ध अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृताबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. मात्र तो मजूर असावा, अशी शक्यता आहे. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खूणा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण स्पष्ट होईल. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.















Leave a Reply