Bhosari crime news: नांदण्याच्या कारणावरून सुनेसह माहेरच्या नातलगांचा सासरच्या घरात राडा
Pckhabar- नांदण्याच्या कारणावरून सुनेसह दहा जणांच्या टोळक्याने सासरच्या घरात राडा घातला. घरात तोडफोड करून सासरच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार २० मार्च रोजी खंडोबा माळ, भोसरी येथे घडला. याबाबत काल तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सून, सुनेची आई, सुनेची बहिण, सुनेची आजी, सुनेचे वडील, दोन सामाजिक कार्यकर्ते आणि अन्य तीनजण अशा दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पापाभाई पीरमहंमद पटेल (वय ६५, रा. खंडोबामाळ, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपी सून मागील चार वर्षांपासून माहेरी आहे. नांदण्याच्या कारणावरून सुनेच्या माहेरचे आणि सासरचे वाद सुरु आहेत. त्यावरून त्यांच्यात वाद आणि तक्रारी देखील झालेल्या आहेत. २० मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता सर्व आरोपी फिर्यादी यांच्या घरी आले. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी यांच्या घरातील लोकांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. दगडाने खिडकी आणि दरवाजे तोडले. घराबाहेर लावलेले चार सीसीटीव्ही कॅमेरे फोडून नुकसान केले. तसेच भांडणाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.













Leave a Reply