टेम्पोच्या धडकेत दोन सख्या बहिणी ठार

टेम्पोच्या धडकेत दोन सख्या बहिणी ठार

Pckhabar-मोपेड दुचाकीवरून जात असलेल्या दोन बहिणींच्या दुचाकीला एका टेम्पोने धडक दिल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रावेत बीआरटी रोड येथे झाला.

शीतल अभिजित गिरमे (वय-31, रा. भोंडवे नगर, रावेत), सायली ज्ञानेश्वर हेगडे (वय-28, रा. नवी सांगवी) अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. याप्रकरणी शीतल यांचे पती अभिजित वसंत गिरमे (वय 35) यांनी रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालक समाधान बाबू केंगले (वय 21, रा. परंदवाडी, सोमाटणे फाटा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नी शीतल आणि फिर्यादी यांची मेव्हणी सायली या दोघी नवी सांगवी येथून फिर्यादी यांच्या रावेत येथील घरी मोपेड दुचाकीवरून (एमएच 14,डी क्यू 3506) जात होत्या.  रावेत बीआरटी रोडने जात असताना मस्के वस्तीकडे जाणार्‍या रस्त्याच्या कॉर्नरला एका टेम्पोने (एमएच 14 एच यु 5940) मोपेड दुचाकीला धडक दिली. यामध्ये शीतल आणि सायली या दोघी गंभीर जखमी झाल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी टेम्पो चालकाला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *