Dehu News : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंचमहाभूत संकल्पनेवर अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केले विविध प्रयोग व प्रकल्प

Pckhabar- अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन अतिशय उत्साहात पार पडला.
अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसरचे उपप्राचार्य डॉ. एन. एन. भुजबळ सर व प्रा. डी. बी. अवसरे सर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेच्या प्रवेशद्वारा जवळ वृक्षारोपण करून विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली.
शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी संवाद साधताना प्रमुख पाहुणे डॉ. भुजबळ सरांनी मार्गदर्शन करीत प्राथमिक विभागातच मुलांच्या मेंदूचा विकास होतो. त्यांच्या मनात विज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करण्याचे हे उत्तम वय आहे. अभंग शाळा मुलांना योग्य मार्गाने घेऊन चालली आहे. लर्निग सिस्टिम आणखी १० वर्षांनी खूप बदलणार आहे. आय टी बेस शिक्षणासाठी मुलांची अशीच तयारी करून घ्यायला हवी. भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मुलांमध्ये विज्ञानाचा जो पाया अभंग शाळा घडवत आहे, तो त्यांना नक्कीच उपयोगी येईल. विज्ञानाशिवाय पुढे पर्याय नाही. देहू ही भूमी अध्यात्माची आहे.
अध्यात्म व विज्ञानाचा विचार महात्मा फुले, संत तुकाराम व छत्रपती शिवरायांनी मांडला . अशाप्रकारच्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करून शाळा अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालत आहे असे मनोगत व्यक्त केले.
त्यासाठी शाळेचे प्राचार्य, शिक्षक, शाळा प्रशासन, पालक यांचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षकांनी प्रकल्प सादर केले.
प्रकल्प प्रतिकृतींची मांडणी आकर्षक होती. पंचमहाभूतांनी हे विश्व बनले आहे.हाच विचार घेऊन संपूर्ण प्रदर्शनात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या विषयांवर आधारित प्रकल्पांचा समावेश होता. इयत्ता पहिली, दुसरी व तिसरीतील जवळपास ७५ विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प यावेळी सादर केले. प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
शाळेचे पटांगण पालकांनी फुलून आले होते. आपल्या पाल्यांचे तोंडभरून कौतुक करत होते. एकंदरीत अभंग शाळेचा सर्व परिसर हा विज्ञानमय झाला होता . शाळेतील सहशिक्षिका सौ. प्राची पोटावले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पर्यवेक्षिका सौ.शैलजा स्वामी मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.
















Leave a Reply