लॉकडाऊनमध्ये कामगार पुरविण्याच्या बहाण्याने सुपरवायझरने कंपनीला एक लाखाला गंडविले

लॉकडाऊनमध्ये कामगार पुरविण्याच्या बहाण्याने सुपरवायझरने कंपनीला एक लाखाला गंडविले
Pckhabar- लॉकडाऊनमध्ये कंपनीतील वेगवेगळ्या साइटवर काम करण्यासाठी कामगार आणण्याच्या बहाण्याने एका बनावट सुपरवायझरने कंपनीला एक लाखांला गंडविले आहे. हा प्रकार तळवडे येथील मधुरे इन्फ्रो इंजिनिअरिंग प्रा. लि. येथे घडला.
याप्रकरणी अ‍ॅडमिन एक्झिक्युटिव्ह अनंत श्रीरंग केंद्रे (वय 32, रा. मोशी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुपरवायझर योगेश धनवडे, वाहन चालक संजय एस चमेडिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश हा फिर्यादी काम करत असलेल्या मधुरे इन्फ्रो इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होता. त्याने सुरुवातीला लॉकडाऊनचे कारण देऊन त्याची कागदपत्रे देण्यास अडचण असल्याचे भासवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.  कंपनीच्या वेगवेगळ्या साइटवर काम करण्यासाठी लेबर लागतील, अशी त्याने कंपनीकडे मागणी केली. तसेच यावर त्याने स्वतःच तोडगा काढला. त्याने कंपनीचे संचालक मधुरे यांना सांगितले की, माझ्या ओळखीचे खूप कामगार आहेत. त्यांना आणण्यासाठी मला यवतमाळला जावे लागेल. आरोपी योगेशच्या नियोजनबद्धतेमुळे कंपनीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि कामगार आणण्यासाठी यवतमाळला जाण्याची परवानगी दिली. 30 ते 40 कामगार आणण्यासाठी त्याने 80 हजार रुपये आणि वाहनाचा खर्च म्हणून 20 हजार रुपये कंपनीकडे मागितले. कंपनीने 80 हजार रुपये अहमदनगर येथील एका बँक खात्यावर आणि वाहतुकीच्या खर्चाचे 20 हजार रुपये यवतमाळ येथील एका बँकेच्या खात्यावर पाठवले. पैसे मिळाल्यानंतर आरोपीने कंपनीकडे फिरकलाच नाही. अ‍ॅडमिन एक्झिक्युटिव्ह  केंद्रे  यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *