Lonavala News : दारूच्या नशेत हुल्लडबाजी करणाऱ्या चार पर्यटकांच्या विरोधात लोणावळा पोलिसांत गुन्हा दाखल
Pckhabar- मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दारूच्या नशेत वाहन चालवत व सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करत धिंगाणा घालणाऱ्या चार पर्यटकांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या हुल्लडबाज पर्यटकांना चौकशीसाठी वाहतुक पोलीस चौकीत आणले असता , त्यांनी तेथे देखील आरडाओरडा करत चौकीच्या खिडकीच्या काचा देखील फोडल्या .
याप्रकरणी पोलीस हवालदार नितेंद्र रामचंद्र कदम ( वय 43 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश संभाजी साळवे ( वय 24 वर्षे ) , सनीत संभाजी साळवे ( वय 22 वर्षे ) , नवनाथ संभाजी साळवे ( वय 30 वर्षे, सर्व राहणार वाशी, नवी मुंबई , मूळ रा . नाणेकर वाडी, चाकण ) , रामदास बबन औटे ( वय 30 वर्षे , रा.गणेगाव ता.शिरूर जि पुणे ) यांच्या विरुद्ध भा.द.वि.कलम 427, 188, 269 सह साथरोग नियंत्रण कायदा 1897 चे कलम 3 मोटार वाहन अधिनियम कलम 185 दारूबंदी अधिनियम कलम 85 ( 1 ) ( 2 ) महा .पो.कायदा कलम 110,112,115 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरची घटना शनिवार सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर ए.वन. चिक्की चौक ते कुमार चौक दरम्यान घडली .
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरील चौघांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करत आमली पदार्थाचे सेवन करून त्यांची वॅगन आर कार (क्र. MH 12 RY 8486 ) मधून जात असताना ए.वन. चिक्की चौकात मोठमोठ्याने आरडाओरडा करत गोंधळ घातला . याची माहिती समजल्याने वाहतूक पोलिसांनी कुमार चौकात सदर कार आडवली. त्यावेळी गाडीचा चालक नवनाथ संभाजी साळवे हा दारूचे नशेत वाहन चालवत होता . त्यांना चौकशी करिता पोलीस चौकीत आणले असता त्यांच्या पैकी गणेश संभाजी साळवे याने नशेमध्ये चौकीच्या खिडकीची काच फोडून नुकसान केले तसेच पोलीस चौकीत देखील आरडाओरडा करून धिंगाणा घातला . याप्रकरणी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जयराज पाटणकर हे पुढील तपास करत आहेत .













Leave a Reply