Sangvi crime news: अबब… इन्शुरन्स कंपन्यातून बोलत असल्याचे सांगून एकाची अडीच कोटींची फसवणूक

ही बातमी शेअर करा.

Sangvi crime news: अबब… इन्शुरन्स कंपन्यातून बोलत असल्याचे सांगून एकाची अडीच कोटींची फसवणूक
Pckhabar- इन्शुरन्स कंपनी, सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून आर्थिक गुंतवणूक करायला सांगत ज्यादा परतावा देण्याचे अमिष दाखवले. त्यासाठी एका व्यक्तीकडून तब्बल दोन कोटी 52 लाख 8 हजार 242 रुपये घेत त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता फसवणूक केली.
याबाबत 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल कुमार (रा. तिलक बझार, दिल्ली), चंद्रशेखर बच्चू सिंग (रा. शिप्रा सनसिटी, गाझियाबाद), शबनम झाहीद खान बानो (रा. उत्तर पूर्ण दिल्ली) आणि अन्य 19 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विठ्ठल लक्ष्मण भालशंकर (वय 47, रा. पिंपळेगुरव, सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 24 जुलै 2012 पासून 21 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घडला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना रिलायन्स लाईफ इन्शुरन्स, बजाज लाईफ इन्शुरन्स, पीएनबी मेटलाईफ इंडिया इन्शुरन्स, डेस्टिनी क्लब, डेविस क्लब इत्यादी वेगवेगळ्या कंपनीतून आणि सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचे भासवले. कंपन्यांच्या पॉलिसी देण्याच्या नावाखाली फिर्यादी यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यातून ज्यादा परतावा मिळणार असे फिर्यादी यांना अमिष दाखवण्यात आले. त्यापोटी फिर्यादी यांच्याकडून ट्रॅन्जेक्शन चार्जेस, जीएसटी चार्जेस, सर्व्हिस टॅक्स, इन्कम टॅक्स चार्जेस, डी डी चार्जेस, पोस्टल चार्जेस, इंस्टालमेंट चार्जेस, रिपोर्ट चार्जेस, बॉण्ड चार्जेस, पोस्टल चार्जेस, फाईल रिओपन चार्जेस, कमिशन चार्जेस, स्टॅम्प ड्युटी चार्जेस इत्यादी वेगवेगळी कारणे सांगून दोन कोटी 52 लाख 8 हजार 242 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर पाठवण्यास सांगतिले. आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून ती फिर्यादी यांना मेल द्वारे पाठवून त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.


ही बातमी शेअर करा.