Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात

Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात
Pckhabar- श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाऊंडेशनच्या अभंग इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत आपली कौशल्ये सादर केली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय कबड्डी व नौकानयन खेळाडू कु. सिद्धी चरणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत क्रीडा क्षेत्राचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. खेळातून शिस्त, आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित होतात, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या क्रीडा स्पर्धांमध्ये ५० मीटर व १०० मीटर धावणे, तीन पायांची शर्यत, अडथळा शर्यत, बुद्धिबळ, रस्सीखेच आदी स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या रंगल्या. इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. अग्नि, जल, पृथ्वी व वायू या चार संघांमध्ये चुरशीचे सामने झाले. सर्वोत्कृष्ट संघ म्हणून ‘अग्नि’ संघाला गौरविण्यात आले.
इयत्तानिहाय सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून इयत्ता पहिली-दुसरीतून तेजस सन्निसे व आर्या कुलकर्णी, तिसरी-पाचवीतून श्रेयस दामले व मनस्वी पंडीत तसेच सहावी-सातवीतून श्रीशांत सूर्यवंशी व समृद्धी मुळे यांची निवड करण्यात आली. विजेत्यांना प्रमाणपत्रे व पदके प्रदान करण्यात आली.
बक्षीस वितरण समारंभास पोलीस अधिकारी संतोष जाधव, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, स्वीकृत नगरसेवक सचिन कुंभार, प्राचार्या डॉ. कविता अय्यर, उपप्राचार्या सौ. शैलजा स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रीडा शिक्षक अश्रफ शेख, मायकेल डेविड व प्रतिक पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अश्रफ शेख यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *