Talegaon Dabhade News : अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची उत्साहात सांगता
Pckhabar-अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित यांच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप आणि यज्ञ सप्ताहाची शुक्रवारी (दि.5) उत्साहात सांगता झाली.

तळेगाव दाभाडे, समर्थनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरासमाेर दि. 28 नाेव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत आयाेजित केलेल्या या सप्ताहामध्ये पहाटेपासून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये गुरूचरित्र वाचन, स्वामींचा अभिषेक व पूजा भूपाळी, आरती, नैवेद्य आरती, स्वामी चरित्र आणि दुर्गा सप्तशती वाचन, ग्राम अभियानांतर्गत 18 विभागाचे मार्गदर्शन, औदुंबर प्रदक्षिणा, नित्य ध्यान, गीतेचा 15 वा अध्याय आणि विष्णुसहस्त्रनाम वाचन या कार्यक्रमाचा समावेश होता. ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी, मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवताहवन, नित्य स्वाहकार, गणेश याग, मनोबोधयाग, स्वामीयाग, श्री गीताई याग, चंडीयाग, रुद्र याग, मल्हारी याग, बलीपूर्णहुती, श्री दत्त जन्मोत्सव, श्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन, अखंड नाम, जप आणि यज्ञ असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले.

या सप्ताहाची सांगता शुक्रवारी (दि.5) ह. भ. प. गणेश महाराज करंजकर यांची संगीतमय श्री स्वामी समर्थ चरित्र कथा आणि प्रवचन सेवा संपन्न झाली. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, नगरसेवक गणेश काकडे, रूपेश निगडे, वैशाली निगडे यांच्यासह माेठ्या संख्येने सेवेकरी उपस्थित हाेते. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.

या कार्यक्रमाचे नियोजन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, सेवेकरी गणेश काकडे यांच्या नेतृत्वाखाली स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सर्व सेवेकऱ्यांनी केले.










Leave a Reply