Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा द्वितीय वार्षिक अंक ‘सृजनदीप’ चे एवरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या हस्ते प्रकाशन

Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा द्वितीय वार्षिक अंक ‘सृजनदीप’ चे एवरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या हस्ते प्रकाशन
Pckhabar- कधीही भंग न पावणारा तो अभंग… याच अभंगाच्या प्रेरणेने आपल्या महाराष्ट्राचा झेंडा महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण जगात पोहोचविण्यासाठी इंग्रजीची गरज असून अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल हे या पद्धतीनेच कार्यरत आहे असे मत रक्षा मंत्रालय, आयुध निर्माणी देहूरोड येथे कार्यरत व एवरेस्ट वीर श्री. श्रीहरी तापकीर यांनी सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, देहू येथील महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त केले.

सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण सोहळा व द्वितीय वार्षिक अंक ‘सृजनदीप’ चा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्राचा भगवा ध्वज म्हणजे वारकरी संप्रदायाची अस्मिता सांगणारा भगवा ध्वज आहे, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा भगवा ध्वज आहे, म्हणूनच महाराष्ट्र हे भारतातील एकमेव असे राज्य आहे की ज्याच्या नावात राष्ट्र असा उल्लेख आलेला आहे. यावेळी शाळेचा द्वितीय वार्षिक अंक “सृजनदीप” चा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते असेही म्हणाले की,
नाचू कीर्तनाचे रंगी |
ज्ञानदीप लावू जगी |
हेच ज्ञानदीप लावताना सृजनदीप नावाचा अंक सृजन फाउंडेशन ने आणला आहे. आधुनिक काळातही विविध उपक्रमांतून शाळेने ‘माझा महाराष्ट्र’ ही संकल्पना राबविण्यात खूप मोठे यश संपादन केले आहे. यावेळी जम्मू ते कन्याकुमारी हा प्रवास सायकल ने पूर्ण करणाऱ्या देहूच्या कन्या पूजाताई बुधावले तसेच सन 2022 मध्ये पुणे ते पानिपत व नुकताच ज्यांनी पुणे ते नेपाळ हा प्रवास सायकल ने पूर्ण करून सामाजिक संदेश देणाऱ्या श्री. प्रशांत जाधव, श्री. नारायण मालपोटे, श्री. बजरंग मोळक, श्री. संतोष दरेकर, श्री. संदीप जगताप या सायकलवीरांचा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सृजन फाउंडेशनच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना ‘विद्यार्थी निधी’तून मदत म्हणून काही ठराविक रकमेचा धनादेश देण्यात आला. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद सर यांनी ओघवत्या शैलीत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गुरुवर्य श्री दत्तात्रय अत्रे, सृजन फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार ॲड. संजय भसे, प्राथमिक आरोग्य केंद्र देहूचे आरोग्य अधिकारी डॉ. किशोर यादव, कवीवर्य डॉ.स्वप्नील चौधरी व डॉ.प्रणाली चौधरी, श्री. वसंतरावजी झेंडे, श्री.अशोकराव नि. मोरे, श्री.सचिन कुंभार आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्राथमिक विभागाचे विद्यार्थी, पालक व शिक्षकवृंद उपस्थित होते. सहशिक्षिका सौ. वृषाली आढाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पर्यवेक्षिका सौ. शैलजा स्वामी यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *