Dehu News : अभंग प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून कल्याणी टेक्नो फोर्ज कंपनीच्या सीएसआर फंडातून देहू जिल्हा परिषद शाळेला सात लाख रुपयाचे शैक्षणिक साहित्य
माजी विद्यार्थी महेश गाडे, अभंग प्रतिष्ठानचे माजी उपाध्यक्ष सुरेश गाडे, नगरसेवक प्रवीण काळोखे यांचा पाठपुरावा
Pckhabar- अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू यांच्या प्रयत्नातून कल्याणी टेक्नो फोर्ज,मुंढवा,पुणे यांच्या सीएसआर फंडातून, या कंपनीचे प्लांट हेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,देहुचे माजी विद्यार्थी महेश लक्ष्मण गाडे यांच्या विशेष सहकार्याने व अभंग प्रतिष्ठानचे माजी उपाध्यक्ष सुरेश लक्ष्मण गाडे व नगरसेवक प्रवीण रामदास काळोखे यांच्या पाठपुराव्यातून देहू गावातील जिल्हा परिषद शाळेला सात लाख रुपयाचे शैक्षणिक साहित्य भेट देण्यात येणार आहे.

आज (बुधवार)सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देहू येथे कंपनीतील सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बँच व टीव्ही शाळेस देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी बँचची व काही शैक्षणिक साधनांची आवश्यकता आहे हे अभंग प्रतिष्ठानच्या सदस्यांनी महेश गाडे यांना सांगितले. त्यानंतर तात्काळ आपल्या कंपनीतील पदाधिकारी यांच्या समवेत महेश गाडे यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन शाळेतील शिक्षकांशी संवाद साधून, शाळेची गरज लक्षात घेऊन कंपनीच्या सीएसआर फंडातून १२० बँच, ४२ इंची ५ स्मार्ट टीव्ही असे सात लाख रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य शाळेस भेट दिले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी कल्याणी टेक्नो फोर्ज या कंपनीतील सर्व पदाधिकारी यांचे व विशेषत्वाने महेश गाडे यांचे विशेष आभार व्यक्त केले. आज जिल्हा परिषद शाळांमधून गोरगरीब, कष्टकरी वर्गातील पालकांची मुलं शिक्षण घेत आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांस सर्व शैक्षणिक सुविधांचा लाभ व्हावा हे लक्षात घेऊन आपण कार्य करीत आहात याबद्दल त्यांनी विशेष समाधान व्यक्त करून कौतुक केले.










Leave a Reply